अडीच लाख शेतकऱ्यांनी भरला पीकविमा; नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद

0
42

अहिल्यानगर : बदलते हवामान, अचानक येणारी आपत्ती आदींमुळे पीकविम्याचे महत्त्व अधिक स्पष्ट झाले आहे. रब्बी हंगामासाठी जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांनी साडेपाच लाख अर्ज दाखल करून पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभाग घेतला आहे. केवळ एक रुपयांत ही विमा योजना आहे. यापूर्वी मिळालेल्या नुकसान भरपाईमुळे शेतकऱ्यांचा सहभाग वाढल्याचे दिसून येत आहे.

नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. विशेषतः बदलत्या हवामानामुळे कीटक, रोग आदींमुळे पिकांचे विमा संरक्षण मिळावे, यासाठी २०१६-१७ पासून पंतप्रधान पीकविमा योजना लागू करण्यात आली. महाराष्ट्र सरकारने केवळ एक रुपयांत ही योजना लागू करण्याचा निर्णय २०२३ मध्ये घेतला. याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला.

जिल्ह्यात कांदा, सोयाबीन, ज्वारी अशा पिकांचे विविध कारणांनी नुकसान होते. बदलत्या हवामानामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचा पेरणीसाठी झालेला खर्चही निघत नाही. अशा परिस्थितीत या पीकविमा योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळाला. जिल्ह्यात एकूण दोन लाख ४९ हजार ५८८ शेतकऱ्यांनी पाच लाख ६० हजार ४०० अर्ज दाखल केले आहेत. योजनेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग वाढत आहे.

मागील वर्षी याच योजनेतून अनेक शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नुकसान भरपाई मिळाली, तसेच कृषी विभागाच्या वतीने अधिकारी, कृषिसेवक आदींच्या माध्यमातून केलेली जनजागृतीमुळेही शेतकऱ्यांची संख्या वाढली असल्याचे दिसून येत आहे.

हवामान बदलाचे विपरित परिणामांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. मागील वर्षी विमा संरक्षण मिळाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळाला. या वर्षी शेतकऱ्यांपर्यंत ही योजना प्रभावीपणे पोहोचली. त्यामुळे योजनेत सहभागी शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यायला हवा.

– सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.