माझ्या कारखान्यावर रेड झाली तेव्हा लोकांनी दोन दिवसांत ११ कोटी जमा केले. लोकांना अंथरायला सतरंजी देता आली नाही, मी त्यांना खाऊ घालू शकले नाही. तुम्ही आज उन्हात बसलात म्हणून स्टेजवरच्या लोकांना देखील मी उन्हात ठेवलंय. कारण माझी माणसं उन्हात असेल तर सत्तेच्या खुर्चीवर सावलीत बसणाऱ्यांचं रक्त गोपीनाथ मुंडेंचं असूच शकत नाही. एकवेळ मला देऊ नका, पण माझ्या माणसाला सत्तेपासून तुम्ही दूर ठेऊ शकत नाही, असा इशाराच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना दिला.
माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आज (२४ ऑक्टोबर) दसऱ्यानिमित्त सावरगाव येथील भगवान भक्तीगडावरून जाहीर सभा घेतली.
“गोपीनाथ मुंडे यांनी जे स्वप्न तुम्हा सगळ्यांसाठी पाहिलं आहे त्यासाठी मी आता मैदानात उतरणार. मी पडले ते झालं.. आता पाडणार आहे. कुणाला पाडणार? जो चारित्र्यहीन असेल आणि पैशांच्या जोरावर राजकारण करत असेल त्याला पाडणार. जो शेतकऱ्यांच्या हिताचं राजकारण करत नसेल त्याला पाडणार. जो तरुणांना बेरोजगारीच्या संकटातून काढणार नाही त्याला पाडणार. जो या महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करुन देण्यात अडसर असेल त्याला पाडणार आहे. आता फक्त मेरीट राहिल. समाजासाठी सेवा करणारं नेतृत्व, चारित्र्यसंपन्न नेतृत्व घडवण्यासाठी मी रात्रीचा दिवस एक करणार. मला काही मिळो न मिळो पण पुढची पिढी गोड जेवण जेवेल यासाठी मी माझं आयुष्य खर्ची घालणार आहे.” असा निर्धार पंकजा मुंडेंनी बोलून दाखवला