विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता देखील उठवली आहे. त्यामुळे राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्यातील हप्त्याची प्रतीक्षा आहे.
महायुती सरकारने निवडणूक काळात घोषणा केली होती की महाराष्ट्रात पुन्हा एकदा त्यांचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना १,५०० रुपयांऐवजी २,१०० रुपयांचा हप्ता दिला जाईल. दुसऱ्या बाजूला दबक्या आवाजात चर्चा होती की निवडणूक झाल्यावर ही योजना बंद होईल किंवा या योजनेचे निकष बदलले जातील. सरसकट सर्वच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, अशा पद्धतीची चर्चा सुरू होती. त्यातच नोव्हेंबर महिना संपला असून अजून या महिन्याचा योजनेचा हप्ता महिलांना वितरीत केलेला नाही. त्यामुळे महिलांसह राज्यातील जनतेच्या मनात या योजनेबाबत संभ्रम आहे.
राज्यातील काळजीवाहू सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेबाबत भाष्य केलं आहे. तसेच महिलांच्या मनातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवारांनी स्पष्ट केलं की लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल केलेले नाहीत.