राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने सातत्याने आमदार परत येणार असल्याबाबतच्या चर्चा होत असतात. विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडूनही असा दावा करण्यात आला होता. आता, याबाबत अजित पवारांनी खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यासोबत असलेले आत्ताचे आमदार माघारी गेले तरी हरकत नाही, आम्ही नव्या लोकांना संधी देऊ, असे अजित पवार यांनी खासगी बोलल्याची माहिती सुत्रांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सध्या अनेक नवे उमेदवार आहेत. आम्ही एकत्रित असताना अनेक नव्या चेहऱ्यांना मी संधी दिली आणि आज ती सर्व मंडळी चांगल्या पदावर काम करत आहेत, असे अजित पवार यांनी म्हटले. त्यामुळे, अजित पवारांनी आमदारांना एकप्रकारे इशाराच दिला असल्याचे दिसून येते.
निलेश लंके याला संधी देण्यामध्ये मीच पुढाकार घेतला होता, असेही अजित पवारांनी सांगितले. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी निलेश लंके सुरुवातीला माझ्याकडून तयार होते. मात्र, मला लोकसभा आणि माझ्या पत्नीला विधानसभा देण्यात यावी अशी त्यांची मागणी असल्याची अजित पवार यांची ऑफ द रेकॉर्ड माहिती आहे. यासंदर्भात मी भाजपच्या नेत्यांशी चर्चा केली होती. मात्र, त्यांचा विद्यमान खासदार असल्यामुळे ते जागा सोडू शकले नाहीत. ही जागा धोक्यात आहे, असेही मी त्यांना त्यावेळी सांगितलं होतं. पण, भाजपच्या नेत्यांनी ऐकलं नाही, असेही अजित पवारांनी म्हटल्याचे समजते.