नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य केले. राज्यसभेच्या उमेदवारीबाबत सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची भेट झाली होती का? याबद्दल माध्यमांनी प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. “पंकजा मुंडे आणि माझी संघटनेच्या विषयानिमित्त नेहमीच भेट होत असते. पण आमच्या भेटीत राज्यसभेच्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. राज्यसभेत कोण जाणार? याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेत असतात. पंकजा मुंडे या राष्ट्रीय मंत्री आहेत. त्यामुळे त्यांना राज्यसभेत पाठवायचे की आणखी कोणते पद द्यायचे हे केंद्रीय नेतृत्व ठरवेल”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.