महाराष्ट्रातली सर्वात रंगतदार निवडणूक होणार आहे ती म्हणजे बारामतीतली. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार म्हणजेच नणंद विरुद्ध भावजय असा थेट सामना आहे. शरद पवारांपासून फारकत घेतलेल्या अजित पवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. आता बारामतीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेलं वक्तव्यही चर्चेत आहे.
भारतीय जनता पक्षामध्ये मोदींवर विश्वास ठेवून कुणीही प्रवेश केला तरीही आमचा विरोध नाही. अधिकृतरित्या आम्हाला कळवलं गेलं की आम्ही एकनाथ खडसेंचंही स्वागतच करु. माझा शरद पवारांना सवाल आहे, शरद पवार बारामतीत उमेदवार नाहीत. सुनेत्रा पवार निवडून आल्या तर मोदींसाठी हात उंचावतील आणि सुप्रिया सुळे निवडून आल्या तर राहुल गांधींसाठी हात उंचावतील. म्हणजेच काय सुनेत्रा पवार यांना दिलेलं मत हे मोदींना दिलेलं मत आहे, सुप्रिया सुळेंना दिलेलं मत हे राहुल गांधींना दिलेलं मत आहे. हे काही लोकांना समजत नसेल तर आम्ही काय करणार? असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.