इंडिया टुडेच्या मुंबई कॉन्क्लेव्हमध्ये देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मुलाखतीदरम्यान अनेक प्रकारच्या राजकीय प्रश्नांची उत्तरं दिली.
२०२४ च्लोकसभा निवडणुकीत जेवढ्या जागा लढवल्या, त्या प्रमाणात जागा जिंकून आणण्यात अर्थात स्ट्राईकरेटमध्ये भाजपा मागे पडल्याबाबत विचारणा केली असता त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. “स्ट्राईक रेटला काही महत्त्व नाही. आकडे तुम्हाला जसे हवेत तसे तुम्ही सांगू शकता. कुणी व्यक्ती एका बॉलमध्ये चार धावा काढून बाद झाला तर त्याचा स्ट्राईक रेट जास्तच राहणार आहे. स्ट्राईकरेट म्हणजे फक्त आकड्यांचा खेळ आहे. दुसरा बिचारा १०० धावा करूनही स्ट्राईकरेटमध्ये ८०वरच राहू शकतो. महाराष्ट्रात क्रमांक एकचा पक्ष भाजपा होता, भाजपा आहे आणि भाजपाच राहील”, असं ते म्हणाले.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मतं आम्हाला जास्त मिळाली. त्या तुलनेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मतं आम्हाला कमी मिळाली. पण एक बाब लक्षात ठेवावी लागेल. हे दोन्ही पक्ष एक प्रकारे फुटून निघालेले नवीन पक्ष होते. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक त्यांचा मतदारवर्ग तयार करण्याची होती. त्यातून मतं आमच्याकडे हस्तांतरित करणं कठीण काम होतं. आमच्यासाठी ते कठीण काम नव्हतं. आम्ही स्थिर पक्ष होतो . त्यामुळे आमची मतं आम्ही त्यांच्याकडे वळवू शकलो. विधानसभेत मात्र हे होणार नाही. विधानसभेत ते नक्कीच मतं आमच्याकडे वळवू शकतील”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.