“वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे खासदार संजय राऊत २५ जुलै रोजी रात्री दोन वाजता सेव्हन डी मोतीलाल मार्ग या ठिकाणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना भेटले. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मातोश्री बंगल्यावर स्वतः कार चालवत गेले. उद्धव ठाकरेंची आणि त्यांची दोन तास बैठक झाली. त्यानंतर ६ ऑगस्टला उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले. दिल्लीत जाताना त्यांच्या बरोबर कोण होतं? दिल्लीत काय ठरलं? हे यांनी जनतेला सांगावं.” असं वंचितचे सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटलं आहे. आम्ही ही माहिती पक्षाकडे आली आहे ती जनतेला सांगत आहोत कारण आरक्षणवादी मतदारांना भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष आरक्षणविरोधी आहेत हे पक्कं माहीत आहे. याच आरक्षणवादी मतदारांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान केलं आहे. महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांतील घडामोडी पाहता जर उलटसुलट राजकीय घडामोडी ( Politics ) पुन्हा घडल्या तर महाराष्ट्रातील आरक्षणवादी जनतेची, मतदारांची फसवणूक होईल. ती होऊ नये म्हणूनच ही माहिती आम्ही देत आहोत असं सिद्धार्थ मोकळे म्हणाले.