बीड जिल्ह्यातील तब्बल दीडशे मुलींना जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्यामुळे बालविवाहापासून वाचवले गेले. मुधोळ यांचे सासर कन्हेरवाडी (ता. परळी) आहे. त्यामुळे बालविवाह होणाऱ्या मुलींसाठी त्यांच्या ‘कलेक्टर वहिनी’ विघ्नहर्ता ठरल्या. बालविवाह रोखण्यासाठी त्यांनी जिल्ह्यात व्यापक मोहीम राबवली. त्यांच्या या कार्याचे भरपूर कौतुकही होत आहे. बालविवाहाच्या या मोहिमेबद्दलची माहिती मुधोळ यांच्याच शब्दांत….
बीड ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. इथले लाखो कामगार वर्षातून ६ महिन्यांसाठी इतर जिल्ह्यांत, इतर राज्यांत स्थलांतरित होतात हे बालविवाहाच्या प्रश्नाचे मूळ कारण आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवालानुसार, बीड बालविवाहाच्या बाबतीत राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. बालविवाहामुळेच कुपोषण, आरोग्यविषयक समस्या असे दुष्टचक्र आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी म्हणून पदभार घेतल्यापासूनच मी ऊसतोड कामगारांचे प्रश्न आणि प्रामुख्याने बालविवाह राेखण्यासाठी काम सुरू केले. यासाठी एक कृती आराखडा केला आणि जनजागृती, कारवाई व मूळ प्रश्नांची सोडवणूक अशा तीन मुद्द्यांवर काम सुरू केले.
जागृतीसाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत दर सोमवारी विद्यार्थ्यांना बालविवाहविरोधी शपथ दिली जाते. चाइल्डलाइनचा १०९८ हा हेल्पलाइन क्रमांक सांगितला जातो. आता मुली, मैत्रिणी बालविवाहांची माहिती प्रशासनाला देतात. गावांमध्ये घोषवाक्ये लिहिली गेली आहेत. स्वातंत्र्य दिनाला प्रत्येक गावात बालविवाहविरोधी जागृती रॅली काढली गेली. आता प्रत्येक गावात पथनाट्येही होणार आहेत.
मागील पाच वर्षांच्या तुलनेत या वर्षी सर्वाधिक बालविवाह आम्ही थांबवले आहेत. १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या काळात १३२ बालविवाह राेखले गेले, तर १ एप्रिल २०२३ ते १५ ऑगस्ट २०२३ या काळात १४७ बालविवाह रोखून १२ गुन्हे नोंद केले आहेत. बालविवाह रोखण्यासाठी स्थलांतर रोखणे महत्त्वाचे आहे.