मद्य धोरण घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पदाचा राजीनामा देण्याची घोषणा करत संपूर्ण देशाला धक्का दिला. त्यानंतर दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण अशी चर्चा सुरू असताना दिल्ली सरकारमधील एकमेव महिला मंत्री आतिशी मार्लेना सिंह यांची मंगळवारी आपच्या आमदारांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली. काळकाजी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार असलेल्या आतिशी यांच्याकडे आप सरकारमधील सर्वाधिक खात्यांची जबाबदारी आहे. आता त्या मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारतील. ११ वर्षांनंतर दिल्लीला महिला मुख्यमंत्री मिळणार आहे.
अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर अनेक आप नेत्यांची नावे या पदासाठी चर्चेत होती. यांमध्ये मंत्री आतिशी, गोपाल राय, कैलाश गहलोत, सौरभ भारद्वाज आणि अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्या नावांचा समावेश होता. मात्र आतिशी या पदासाठी आघाडीवर होत्या कारण केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या मद्य धोरण प्रकरणातील अटकेनंतर त्यांनी पक्षात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
२१ मार्च रोजी अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. मनीष सिसोदिया सुद्धा तुरुंगात होते. त्यामुळे पक्षात आणि सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा कोणताही नेता शिल्लक नव्हता. सौरभ भारद्वाज यांच्यासह लोकसभा निवडणुकीवेळी सरकारच्या बाजूने प्रचार केला. या काळात त्या माध्यमांमध्ये आणि जनतेतीही दिसू लागल्या होत्या. जून महिन्यात हरियाणा सरकारने १०० दशलक्ष गॅलन प्रतिदिन पाणी न सोडल्यामुळे राजधानीत निर्माण झालेल्या पाणी संकटाविरोधात त्यांनी अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू केलं होतं. यावेळी तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखलं करावं लागलं होतं. केजरीवाल यांच्या अटकेपासूनच आतिशी मुख्यमंत्री पदाच्या दावेदार मानल्या जात होत्या किंवा तुरुंगातून सरकार चालवण्याचा पर्याय होता.