देशाच्या संसदेतून आत्तापर्यंत तब्बल १४१ खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. दि. १३ डिसेंबर रोजी लोकसभेत दोन अज्ञात तरुणांनी घुसखोरी केल्यानंतर त्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत निवेदन करावं, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. तर दुसरीकडे गोंधळ घालणाऱ्या विरोधी खासदारांवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यात आता लोकसभा सचिवालयाने निलंबित खासदारांसाठी एक परिपत्रक काढलं असून त्यांना काही सूचना केल्या आहेत.
निलंबनाच्या काळात खासदार त्यांचे संसद भवनातील चेंबर्स, लॉबी किंवा गॅलरीमध्ये प्रवेश करू शकत नाहीत.
२. हे खासदार सदस्य असलेल्या संसदीय समितीच्या बैठकांना त्यांना उपस्थित राहता येणार नाही.
३. लोकसभेच्या कामकाजात त्यांच्या नावावर कोणताही प्रस्ताव किंवा मुद्दा नमूद केला जाणार नाही.
४. निलंबनाच्या काळात त्यांनी दिलेली कोणतीही नोटीस कामकाजात समाविष्ट केली जाणार नाही.
५. या काळात घेण्यात आलेल्या कोणत्याही संसदीय समिती निवडणुकीत त्यांना मत देता येणार नाही.
६. या काळात त्यांना संसद कामकाजासाठी मिळणारा दैनंदिन भत्ता मिळणार नाही.