अपघात टाळण्यासाठी एमआयडीसीला सर्व्हिस रोड तयार करा
युवा सेनेची मागणी
अतिक्रमण व रस्त्यावर भरणाऱ्या भाजीबाजारामुळे अपघातांना मिळतोय आमंत्रण
अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नगर-मनमाड महामार्गावरील अतिक्रमण व रस्त्यावर भरणाऱ्या भाजीबाजारामुळे अनेक अपघात घडत असून तातडीने सदरील अतिक्रमण काढून एमआयडीसी नगर-मनमाड हायवे लगत सर्व्हिस रोड तयार करण्याची मागणी युवा सेनेच्या (शिंदे गट) वतीने करण्यात आली आहे. युवा सेनेचे जिल्हा प्रमुख योगेश गलांडे यांनी एमआयडीसीचे उप अंभियता संदिप बडगे यांना सदर मागणीचे निवेदन दिले. यावेळी नवनागापूरचे माजी उपसंरपच नरेश शेळके, ग्रामपंचायत सदस्य दिपक गिते, शंकर शेळके, वैभव सुरवसे, अमित बारवकर, सुनिल शेवाळे, अस्लम इनामदार, शुभम शिंदे आदी उपस्थित होते.
एमआयडीसीचे क्षेत्र हे नगर-मनमाड महामार्गालगत असून, या महामार्गालगत एमआयडीसीचे भरपूर प्रमाणात क्षेत्र आहे. सदर मोकळ्या जागेमध्ये अनाधिकृतपणे टपऱ्यांचे अतिक्रमण करण्यात आले आहे. तर सदर जागेमध्ये अनाधिकृतपणे भाजीपाला बाजार भरत असतो. यामुळे तेथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, भाजीपाला घेण्यासाठी येणारे लोक रस्त्याच्या कडेला वाहने लावत असल्याने गर्दी होऊन या रस्त्यावर अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे. या अतिक्रमणामुळे दररोज वाहतुक कोंडी होत आहे. अनेक लोकांना या रस्त्यावरील बेशिस्तपणामुळे जीव गमवावा लागला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नवनागापूर गाव येथील बहुतांशी कामगार एमआयडीसीत जाण्यासाठी गर्दी करत असतात. भूखंडावरील काही व्यावसायिक शोरूमवाले यांनी अनाधिकृतपणे एमआयडीसीच्या जागेचा वापर सुरू केलेला आहे. महामार्गावर अनाधिकृतपणे शासकीय परवानगी न घेता मेन गेट सुरू करून व्यवसाय सुरू केलेला आहे. त्यामुळे महामार्गावर वाहनांची खूप गर्दी होऊन अपघात होत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
एमआयडीसी नगर-मनमाड हायवे लगतची अतिक्रमणे हटवून सर्व्हिस रोड तयार केल्यास एमआयडीसीत जाण्या- येण्यासाठी कामगारांसह नागरिकांची सोय होणार आहे. यामुळे महामार्गावरील वाहनांची गर्दी कमी होऊन अपघात टाळता येतील. यासाठी तातडीने नागापूर एमआयडीसी येथील नागापूर सनफार्मा चौक ते शेंडी बायपास शासकीय दूध डेअरी पर्यंत सर्व्हिस रोड तयार करुन त्याला तारेचे कुंपन टाकण्याची मागणी युवा सेनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.
नगर-मनमाड एमआयडीसी महामार्गावरील अतिक्रमण अपघात टाळण्यासाठी सर्व्हिस रोड तयार करण्याची मागणी
- Advertisement -