मुंबई: वांद्रे येथील रहिवासी मोहम्मद सईद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार नितेश राणे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत मुख्यमंत्री शिंदे आणि आमदार राणे यांच्यावर मुस्लिमविरोधी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचिकेद्वारे मुख्यमंत्र्यांनी भडकाऊ भाषणांचे समर्थन केल्याचा दावा केला जात आहे आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
या याचिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार नितेश राणे यांच्यासह रामगिरी महाराज, हिंदू जनजागृती समिती, गुगल, ट्विटर, पोलीस महासंचालक आणि अन्य यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांचे वकील एड. एजाज नख्वी यांच्या मार्फत करण्यात आलेल्या या याचिकेत भडकाऊ वक्तव्ये आणि मुस्लिम विरोधी भाषणांबद्दल कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
याचिकेतील मुख्य आरोपांमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की मुख्यमंत्री शिंदे आणि आमदार राणे यांनी मुस्लिम विरोधी वक्तव्यांची पाठराखण केली आहे आणि यामुळे मुस्लिम समाजात असंतोष निर्माण झाला आहे. या भडकाऊ भाषणांमुळे धार्मिक तेढ वाढत असल्याचेही याचिकेत सांगितले आहे.या प्रकरणावर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. याचिकेत आणखी एक महत्त्वाची मागणी म्हणजे मुस्लिम विरोधी भाषणांचे प्रसारण सोशल मीडियावरून तातडीने काढून टाकावे, तसेच न्यायालयाने मुस्लिमांना टार्गेट करणाऱ्या मोर्चे आणि आंदोलने यांचे लाइव्ह टेलिकास्ट न करण्याचे आदेश द्यावेत.
याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला विनंती केली आहे की, अशा प्रकारच्या भडकाऊ वक्तव्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी आणि मुस्लिमविरोधी संदेश पसरवण्यापासून थांबवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत.