भारतीय जनसंसदेचे जिल्हा रुग्णालयासमोर धरणे
दिव्यांगांचे बोगस प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग व राज्य शासनाच्या विविध विभागात नोकरीत सवलती घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनसंसदेच्या वतीने क्रांतीदिनी शहरातील जिल्हा रुग्णालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे, अशोक सब्बन, अर्शद शेख, बबलू खोसला, अशोक भोसले, जसवसंतसिंह परदेशी, पोपट साठे, बाळासाहेब पालवे, वीरबहादूर प्रजापती, डोंगरगणचे मा. सरपंच कैलास पठारे, राम धोत्रे, प्रकाश गोसावी, जयेश देवळालीकर आदी सहभागी झाले होते.
राज्यात आणि देशात दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा गाजत आहे, मात्र या घोटाळ्याची महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन देखील गांभीर्याने दखल घेताना दिसत नाही. ही चिंताजनक बाब असून, बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे अनेकांनी केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, राज्य शासनाच्या विविध विभागात येणाऱ्या नोकऱ्यांमध्ये सवलती घेऊन मुळ दिव्यांग व्यक्तींवर मोठ्या प्रमाणात अन्याय केला आहे. त्यातच अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वेबसाईटवरून काही व्यक्तींनी बनावट प्रमाणपत्र तयार करून घेतले आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई झाली नसल्याने यामधील दोषींवर गुन्हे दाखल होण्यासाठी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
5 ऑगस्ट रोजी भारतीय जनसंसदच्या वतीने सदर व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र त्यानंतर देखील कारवाई झालेली नसून, सदर व्यक्तींवर कारवाई झालेली नाही. या घटनेमध्ये जिल्हा रुग्णालयातील अधिकारी यांनी संगनमताने बनावट दिव्यांगांचे दाखले दिले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
जिल्हा रुग्णालयात झालेला प्रकार हा अफरातफरीचा असून, हॉस्पिटलची यंत्रणा हॅक होत असेल तर किती मोठा अनर्थ होऊ शकतो. त्या संबंधी पोलिसांमध्ये तक्रार देखील दिली जात नाही, हे संशयास्पद असून, जिल्हा रुग्णालयाने तातडीने पोलीसात तक्रार द्यावी व दिव्यांगांचे बोगस प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय जनसंसदच्या वतीने करण्यात आली आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयातील दिव्यांगांचे बोगस प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
- Advertisement -