बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करत सोमवारी सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. दुसरीकडे सुमारे तासभर झालेल्या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे (अप) अध्यक्ष अजित पवार यांनी चौकशीत अद्याप कोणाचेच नाव पुढे नसल्याचे सांगत मुंडे यांना अभय दिले.
मुंडे यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची सोमवारी भेट घेतली. मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला असतानाच सोमवारी सायंकाळी मुंडे यांनी अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेतली. सुमारे तासभर उभयतांमध्ये खलबते झाली. त्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येची विशेष चौकशी पथक, बीड पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. याशिवाय न्यायालयीन चौकशीची घोषणा झाली आहे. जेव्हा-केव्हा चौकशीत नावे समोर येतील तेव्हा कारवाई करू, असे सांगत अजित पवारांनी मुंडे यांना एका अर्थी अभय दिले.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज अजित पवार यांची भेट घेतली. पदभार स्विकारल्यानंतर माझ्या खात्यासंदर्भात दोन -तीन बैठका झाल्या आहेत, काही निर्णय घेतले आहेत, त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट होती, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, या संदर्भात त्यांना विचारलं असता या प्रकरणावर कोणतीही चर्चा झाली नाही. कोणी काय आरोप करावेत हा ज्याचा त्याचा विषय आहे. लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिला आहे, मी काय प्रत्येकाचं तोंड धरू शकत नाही. ज्या पक्षातील नेत्यांकडून आरोप होत आहेत, त्या पक्षाच्या अध्यक्षांना हा प्रश्न विचारा. पोलीस यंत्रणा काम करत आहे. माझ्याकडे जेव्हा संशयानं पाहिलं जातं, तेव्हा या संदर्भात मी अधिक बोलणं योग्य नाही. ज्या तपास यंत्रणांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांचा तपास पूर्ण होऊ द्या, ट्रायल कोर्टात होऊन द्या, तपास यंत्रणा काम करत आहेत, असं मुंडे यांनी म्हटलं आहे.