नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांना प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असतानाच आता ठेवीदारांना ठेवी परत करण्याचा आदेश केंद्रीय निबंधकांनी अवसायक गणेश गायकवाड यांना दिला आहे. गायकवाड यांना तसा ई-मेल प्राप्त झाला आहे. यामुळे ठेवीदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. बँकिंग परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रद्द केल्याने गेल्या 36 महिन्यांपासून ठेवीदारांच्या कोट्यवधींच्या ठेवी अडकल्या आहेत.
अॅड.साईदीप अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांना ठेवीदारांच्या ठेवींपैकी 80 टक्के रक्कम परत मिळण्याबाबत पत्र दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकार्यांमार्फत अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी केंद्रीय निबंधकांना पत्र पाठविले होते. त्याची दखल घेत केंद्रीय निबंधक रवीकुमार अग्रवाल यांनी नगर अर्बन बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांना पत्र पाठवून सर्व ठेवीदारांना ठेवीच्या 50 टक्के रक्कम नियमाप्रमाणे परत देण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे बँकेच्या ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
केंद्रीय निबंधकांसमोर म्हणणे मांडताना अॅड. अग्रवाल यांनी 80 टक्के ठेवीची रक्कम परत देण्यायोग्य असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर केंद्रीय निबंधकांनी ठेवीची 50 टक्के रक्कम परत देण्याचा आदेश पारित करीत उर्वरित रक्कमही लवकरात लवकर देण्याबाबत कार्यवाही करण्याचे सांगितले. बँकेने प्रभावी कर्ज वसुली करून ठेवीदारांचे सर्वच्या सर्व पैसे परत दिल्यानंतर बँकेत कमीत कमी 50 कोटी रुपये शिल्लक राहिल्यास बँकेचा रद्द परवाना पूर्ववत चालू करण्यास मदत करण्याचे आश्वासनही केंद्रीय निबंधकांनी दिले आहे. दरम्यान, सर्व ठेवीदारांच्या ठेवी परत करून शंभर टक्के कर्ज वसुली केल्यास बँकेकडे 865 कोटी रुपये शिल्लक राहू शकतात, असेही या पत्रकात म्हटले आहे.






