Monday, April 28, 2025

नवाब मलिक महायुतीत नको, देवेंद्र फडणवीस यांचे अजित पवारांना जाहीर पत्र…

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक गुरूवारी हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात आले. ते सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या आमदारांच्या जवळ बसले. तसेच ते अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांच्या कार्यालयात बसले. त्यामुळे नवाब मलिक यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं चित्र दिसलं. यावरुन ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र पाठवून सविस्तर भूमिका मांडली आहे. अजित पवारांनी नवाब मलिकांचं आपल्या पक्षात स्वागत केलं, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना महायुतीत सहभागी करुन घेण्यास विरोध दर्शवला आहे.

माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. पण ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही”, असे आमचे मत आहे, असं देवेंद्र फडणवीस पत्रात म्हणाले.

सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे. हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतू, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे”, असं फडणवीसांनी पत्रात स्पष्ट केलं.

“त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे”, असं देवेंद्र फडणवीस पत्रात म्हणाले आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles