यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वातील महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी आज भाजपाकडून पदाधिकारी आणि आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या पराभवाची कारणं सांगितली. तसेच त्यांनी यावेळी राजीनाम्याच्या मुद्द्यावरही भाष्य केलं.
“या निवडणुकीत आपण फक्त तीन पक्षांशी नाही, तर ४ पक्षांशी लढत होतो. तो ४ चौथा पक्ष म्हणजे खोटा प्रचार होता. हा खोटा प्रचार आपल्या लक्षात आला नाही. त्यामुळे आपण त्याला रोखू शकलो नाही किंबहूना आपण त्याला रोखण्यासाठी तयारी करू शकलो नाही”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
“या निवडणुकीत भाजपा संविधान बदलणार असा खोटा प्रचार करण्यात आला. त्याचा परिणाम जेव्हा आपल्याला लक्षात आला, तेव्हा राज्यात ४ टप्प्याचे मतदान झाले होते. आपण या खोट्या प्रचाराला योग्य प्रकारे उत्तर देऊ शकलो नाही. त्याचा परिणाम म्हणजे, पहिल्या तीन टप्प्यात भाजपाला २४ पैकी केवळ ४ जागा मिळाल्या, तर उर्वरित जागा आपल्याला पुढच्या दोन टप्प्यात मिळाल्या”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी राजीनामाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. “मी ज्यावेळी राजीनामा देण्याचा विचार केला तेव्हा माझ्या डोक्यात काही रणनीती होती, आजही आहे. आपण सगळ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. मी काल अमित शाह यांना भेटलो. त्यांचीही भूमिका तुमच्यापेक्षा फार वेगळी नव्हती. ते मला म्हणाले की, थोडे दिवस जाऊद्या. त्यानंतर आपण महाराष्ट्राबाबतची ब्ल्यू प्रिंट ठरवू” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.