मुंबई : लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील पाचवा आणि अंतिम टप्पा २० मे रोजी पार पडणार असतानाच, भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन घोटाळ्यातील आरोपांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. सिंचन घोटाळ्यातील आरोप चुकीचे नव्हते, असं फडणवीस म्हणाले. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीचा राज्यातील अखेरच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होत आहे. मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी खुद्द नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे सभा घेत आहेत. या सभेआधीच देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत सिंचन घोटाळ्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केलेल्या वक्तव्यानं राजकीय धुरळा उडाला आहे.
‘सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर आरोप केले होते. त्यात चुकीचे असे काही नव्हते. मी या प्रकरणात जे प्रश्न उपस्थित केले, त्यानुसार कारवाई करण्यात आली’, असे फडणवीस म्हणाले.’या प्रकरणी एफआयर देखील नोंद आहे. तसेच चार्जशीट देखील फाईल करण्यात आली आहे. काही जणांना दोषी ठरविण्यात आलं आहे. या प्रकरणात निकष दुरुस्त करण्यात आले, त्याबाबत समाधानी आहे. या भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. आता निविदा प्रक्रियेत नवीन नियम आणि अटी लागू करण्यात आले आहेत’,असे ते म्हणाले.
‘या विभागाचे प्रमुख अजित पवार होते. त्यामुळे त्यांना जबाबदार धरावे लागत होते. यंत्रणेने या प्रकरणाची १३-१४ वर्ष चौकशी केली. यंत्रणेने चार्जशीटमध्ये त्यांची थेट भूमिका नसल्याचे म्हटलं. त्यामुळे यंत्रणेच्या तपासाकडे जावे लागेल. कोकणातील एका प्रकरणात यंत्रणेने एका चार्जशीटमध्ये म्हटले की, ‘आम्ही अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या भूमिकेचं परिक्षण करत आहोत’. याचा अर्थ चार्जशीटमध्ये त्यांचा नावाचा उल्लेख नाही’.