गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार आणि लोकसभा निवडणूक लढवणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या या चर्चांवर आता फडणवीसांनी स्वत: पडदा टाकला आहे.
मी विधानसभा निवडणूक लढवणार आणि ते देखील नागपूरमधूनच. १० वर्षानंतर देखील मी भाजपमध्येच काम करेल आणि पक्ष सांगेल तिकडे काम करेल, असं म्हणत फडणवीसांनी चर्चांना पूर्णविराम दिलाय.देशातील जनतेने तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे, असंही फडणवीसांनी यावेळी म्हटलं आहे. नागपुरमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना फडणवीसांनी आपल्याबाबत सुरु असलेल्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलंय.
पुढील दहा वर्षांत तुम्ही स्वतःला कुठे पाहता असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी विचारला होता. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देत फडणवीसांनी म्हटलं की, मी भाजपसोबतच राहील आणि पक्ष मला देईल ती कोणतीही जबाबदारी मी पार पाडेल. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असंही फडणवीसांनी यावेळी म्हटलं.
मराठा आरक्षणाच्या मागणीवर देखील फडणवीसांनी यावेळी रोकठोक भाष्य केलं. सध्या मनोज जरांगे पाटलांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. ते राज्यात ठिकठिकाणी भेट देऊन आशिर्वाद घेतायत. या सर्वांत कायदा सुव्यवस्था कुठेही बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणासाठी शब्द दिलाय आणि ते तो शब्द पाळत आहेत, असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.