नवी दिल्ली : राज्यसभेतील १२ जागांसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी भाजपने नऊ उमेदवारांची घोषणा केली असून राज्यातून दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपचे विधानसभा निवडणुकीतील ‘मिशन कोकणा’ला वेग मिळाला आहे.
केंद्रीयमंत्री पीयुष गोयल व भाजपचे नेते उदयनराजे भोसले लोकसभेवर निवडून गेल्यामुळे राज्यातून राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. त्यापैकी उदयनराजेंची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहे. पीयुष गोयल यांच्या जागी धैर्यशील पाटील यांना संधी देऊन भाजपचे त्यांचे राजकीय पुनर्वसन केले असल्याचे मानले जात आहे.
‘शेकाप’चे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी गेल्या वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पाटील यांना रायगडमधून लोकसभेची उमेदवारी देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. मात्र, महायुतीत अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाल्याने ही जागा भाजपला मित्र पक्षासाठी सोडून द्यावी लागली. पाटील यांची लोकसभेची संधी हुकल्यामुळे त्यांना यावेळी भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.