धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी सोमवारी राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
या आंदोलनादरम्यान बोलताना भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली. धनगरांनी मेंढरं, बकरी राखायचे बंद केले तर महाराष्ट्रातल्या जनतेला कुत्र्याचे मटण खायला लागेल, असं गोपीचंद पडळकर म्हणालेत. पडळकर यांच्या या विधानावरुन नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुणे बेंगलोर महामार्गावर धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. आमदार गोपीचंद पडळकर हे या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. या आंदोलनादरम्यान गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी धनगर आरक्षणाची बाजू मांडताना पडळकरांची हे धक्कादायक विधान केले आहे.