महायुतीमध्ये धाराशिव लोकसभेची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे. भाजपमधून नुकत्याच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीकडून धाराशिवमध्ये लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर आता धाराशिवमधील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. धाराशिवचा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला दिल्यानं शिवसैनिक नाराज आहेत. धाराशिवमधील शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मुंबईकडे निघाले आहेत.
तीन हजार गाड्यांचा ताफा घेऊन 25 हजार शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत. वर्षा बंगल्यावर शिवसैनिकांकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या नेतृत्वात शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. दरम्यान धाराशिवमध्ये शिवसैनिकांकडून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विरोध होत असल्यानं अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.