मलादेखील एक सिनेमा काढायचा आहे. मी जेव्हा सिनेमा काढेन, तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटले जातील, अनेकांचे खरे चेहरे समोर येतील. योग्य वेळ आली की, निश्चितच मी सिनेमा काढणार”, असे सूचक विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाच्या कार्यक्रमात केले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच फडणवीस मुख्यमंत्री शिंदेंना उद्देशून म्हणाले की, आताच्या घडामोडींपर्यंत सिनेमा आला असेल तर माझे पात्र त्यात आहे का? यावर शिंदे म्हणाले की, तुमचे पात्र ‘धर्मवीर ३’ मध्ये आहे. यानंतर फडणवीस यांनी स्वतःचा सिनेमा काढायचा असल्याची इच्छा बोलून दाखवली.
फडणवीस पुढे म्हणाले, “धर्मवीर सिनेमा ज्यांनी ज्यांनी पाहिला, त्यांना या सिनेमाने चेतवले. सिनेमा ज्यावेळी प्रदर्शित झाला, तेव्हा याचा भाग दोन येईल, हे कुणाला माहीत नव्हते. चित्रपटाबरोबरच शिंदे यांच्या जीवनाचा भाग दोन येईल, याचीही कुणाला कल्पना नव्हती. पण तोही भाग दोन लवकरच सुरू झाला. दिघे यांच्या शिकवणुकीप्रमाणे शिंदे यांनी ज्याप्रकारे आज महाराष्ट्राची धुरा सांभाळली आहे. ते पाहता आनंद दिघे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे स्वर्गातून त्यांना आशीर्वादच देत असतील. कारण या दोघांनाही विचारांची गद्दारी मान्य नव्हती.”