Sunday, July 21, 2024

धीरेंद्र शास्त्रींच्या सत्संगसाठी साडेतीन कोटींची मागणी, पैसे न दिल्याने बेदम मारहाण; १२ जणांविरोधात गुन्हा

बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्रींच्या सत्संग कार्यक्रमाच्या आयोजनासाठी साडेतीन कोटींची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बोलणी करून कार्यक्रम न झाल्यामुळे मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीला बागेश्वर धाम संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षाकडून घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अभिजीत करंजुले यांच्यासह १२ जणांविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आळा आहे.

माहितीनुसार, लोकसभा निवडणुकांपूर्वी हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी देशभरात बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री यांच्या सत्संग कार्यक्रमाची मोठी मागणी होती. राजस्थान येथे लोकसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्या अशोक शर्मा या उमेदवाराने देखील आपल्या मतदारसंघात बागेश्वर धाम यांच्या सत्संगचे आयोजन करण्यासाठी आपल्या मित्राच्या माध्यमातून बागेश्वर धाम महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी अभिजीत करंजुले आणि मयुरेश कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला.

या सत्संग कार्यक्रमासाठी साडेतीन कोटी रुपयांची मागणी उमेदवाराकडे करण्यात आली. मात्र उमेदवाराने असमर्थता दाखवल्यानंतर आणि वर्मा यांच्याकडून महाराष्ट्र प्रदेश पदाधिकाऱ्यांसोबतचे फोनवरील संभाषण रेकॉर्ड करून व्हायरल केल्यामुळे अभिजीत करंजुले आणि मयुरेश कुलकर्णी यांनी १० ते १२ जणांना सोबत घेऊन मध्यस्थी करणाऱ्या मुंबई येथे राहणाऱ्या नितीन उपाध्याय यांच्या घरात घुसून संपूर्ण कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. यासोबत घरातील रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू आणि दागिने लंपास केले.

अभिजीत करंजुले आणि मयुरेश कुलकर्णी हे १० ते १२ जणांना घेऊन नितीन उपाध्याय यांच्या घरी जातानाचा व्हिडीओ समोर आला आहे. उपाध्याय राहत असलेल्या इमारतीच्या लिफ्टमधून बाहेर पडतानाचा त्यांचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. आता याप्रकरणी अभिजीत करंजुले यांच्यासोबत १० ते १२ जणांविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करूनही एकाही आरोपीला अद्याप अटक झाली नाही. राजकीय दबाव असल्यामुळेच आरोपींना अटक केली जात नसल्याचा आरोप नितीन उपाध्याय यांनी केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles