पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून विविध विकासकामांचा आढावा
जिल्ह्यातील औद्योगिक आणि पर्यटन विकासाचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश
राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा-पालकमंत्री
अहमदनगर
अहमदनग, – राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आणि जिल्ह्यात नवीन उद्योग आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
बैठकीस जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिपक दातीर, पर्यटन उपसंचालक मधुमती देसाई, एमआयडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीन गवळी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.विखे पाटील यांनी जिल्ह्यातील पर्यटन विकास आराखड्याबाबत आढावा घेतला. ते म्हणाले, जिल्ह्यात टुरिझम सर्किट विकसित करण्यासाठी आराखडा तयार करण्यात यावा. पर्यटनस्थळांचा विकास करतांना एकात्मिक दृष्टिकोन ठेवावा. पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा, पायाभूत सुविधांचा विकास, पर्यटनाच्यादृष्टीने कौशल्य विकासावर भर आदी बाबींवर विशेष भर द्यावा. ऐतिहासिक पर्यटनस्थळांचे संवर्धन आणि तेथील सुविधांकडे लक्ष द्यावे. अशा ठिकाणी स्वच्छता राहील याची दक्षता घ्यावी.
जिल्ह्यातील औद्योगिक विकासाचा आढावा
जिल्ह्यातील नवीन मंजूर झालेल्या औद्योगिक क्षेत्रात उद्योग सुरू व्हावेत यादृष्टीने आवश्यक कार्यवाही करावी. मोठे उद्योग आल्यावर त्याच्याशी निगडित इतर उद्योग-व्यवसाय परिसरात विकसित होतात. उद्योगांसाठी जागा आवश्यक असल्यास उपलब्ध करून देण्यात येईल. अहमदनगर जिल्ह्यात औद्योगिक विकासाला संधी असल्याने उद्योग विकासासाठी उद्योजक परिषदेचे आयोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यात उद्योगांसाठी एक हजार एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. अहमदनगर येथून वंदे भारत रेल्वे सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात अहमदनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. निर्यातवृद्धीसाठी जिल्हा गुंतवणूक परिषदेत ५ हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले, त्यापैकी अडीच हजार कोटींचे उद्योग सुरू झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
संगमनेर, श्रीरामपूर, जामखेड, राहुरी आणि पारनेर येथे उभारावयाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाचांही यावेळी आढावा घेण्यात आला.
राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा
राज्य शासनाने लोककल्याणच्या विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ सामान्य जनतेला होईल यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश श्री.विखे पाटील यांनी दिले. पालकमंत्र्यांनी राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा यावेळी आढावा घेतला.
ते म्हणाले, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा अधिकाधिक उमेदवारांना लाभ देण्याचा प्रयत्न करावा. यासाठी विविध अस्थापनांची बैठक आयोजित करून त्यांना आवाहन करण्यात यावे. तालुकास्तरावरील विविध आस्थापनांमध्ये युवकांना नियुक्ती देण्यासाठी शिबिराचे आयोजन करावे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांना देण्याचे प्रयत्न करावे. शासनाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
विविध योजनेत जिल्ह्याने चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. वयोश्री योजनेत जिल्ह्यात अधिकाधिक नागरिकांची नोंदणी झाल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ११ लाख ३६ हजार ९४४ महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत ४ हजारपेक्षा अधिक युवकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
बैठकीला दुरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि एकात्मिक विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.