श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज खरेदी-विक्री संघाचे संचालक व व्यंकनाथ लोणी येथील सुनील पांडुरंग पाटील( वय ४३) यांचा ट्रॅक्टर खाली सापडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. १९) दुपारी तीनच्या सुमारास घडली. पाऊस येईल म्हणून वाखारीतील कांदा झाकण्यासाठी एक मजूर,ट्रॅक्टर घेऊन कुकडीच्या वांगदरी फाटा कालव्यावरील रस्त्याने सुनील पाटील चालले होते.
पाटील हे स्वतः ट्रॅक्टर चालवत होते. कालव्याच्या विरुद्ध बाजूस ट्रॅक्टर उलटला. मजुराने विरुद्ध दिशेने उडी मारली. त्यामुळे मजूर सचिन भानुदास लबडे हे बचावले. मात्र, सुनील पाटील ट्रॅक्टर खाली सापडले.
यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.अपघाताची माहिती समजताच राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा, लोणी व्यंकनाथचे पोलिस पाटील मनोज जगताप, डॉ. संतोष ओव्हळ, राहुल गोरखे, गणेश काकडे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.सुनील पाटील यांचे बंधू धनंजय पाटील यांचे दहा वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले होते. त्यानंतर पाटील परिवारास अपघाताचा हा दुसरा धक्का बसला आहे. या घटनेने लोणी व्यंकनाथ परिसरात शोककळा पसरली
आहे. त्यांच्या मागे वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.