समन्वयक अधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुक कामांचे सूक्ष्म नियोजन करावे-जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
अहमदनगर -आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने समन्वयक अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करावे , असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत दिले.
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील आणि समन्वयक अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप कार्यक्रमांवर भर द्यावा. औद्योगिक अस्थापनांमधील कामगार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी जनजागृतीचे उपक्रम राबवावे. मतदान केंद्रावरील दिव्यांग मतदारांची माहिती घेऊन त्या प्रमाणात सुविधा कराव्यात. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर भर द्यावा. प्रत्येक समन्वयक अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार काम करावे. लोकसभा निवडणुकीत सर्वांनी चांगले काम केल्याचे नमूद करून विधानसभा निवडणुकीतही असेच काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीत मनुष्यबळ, स्वीप कार्यक्रम, ईव्हीएम व्यवस्थापन आदी विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.