पीक स्पर्धेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन
अहमदनगर, दि. 15 जुलै :- खरीप हंगामामध्ये सर्वसाधारण आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी,मका नाचणी(रागी),तूर, मुग, उडिद, सोयाबीन, भुईमूग व सुर्यफुल या ११ पिकांसाठी पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन या पीक स्पर्धेमध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येऊन उत्पादकतेमध्ये वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशिल शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पाकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढुन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. त्यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकुण उत्पादनात भर पडेल, या उद्देशाने राज्यांतर्गत या पीकस्पर्धा राबविण्यात येत आहेत.
पीकस्पर्धेची ठळक वैशिष्ट्ये व बाबी
पीकस्पर्धेमध्ये मुग व उडिद पिकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै, 2024 अशी असुन भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तुर, सोयाबीन, भुईमूग व सुर्यफुल या पिकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट, 2024 अशी राहणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र असुन सर्वसाधारण गटासाठी 300 रुपये तर आदिवासी गटासाठी 150 रुपये राहील. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावावर जमीन असणे व ती जमीन स्वत: कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. भातपीक स्पर्धेत सहभाग घेऊन इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांने किमान 20 आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान 40 आर (एक एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
पीकस्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असुन सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पीकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभुत धरुन राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार असल्याचेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
अहमदनगर पीक स्पर्धेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन
- Advertisement -