अहमदनगर, ता. २० : ऑनलाईन पद्धतीचा वापर करून कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला आहे.तरूण झारखंड राज्यातील तर तरूणी ही अहमदनगर जिल्ह्यातील रहिवाशी होती. तीन महिन्यात हा खटला निकाली निघाला.पती हे नोकरीनिमित्त काही वर्षांपासून त्यांचे मूळ गावी धनबाद,
झारखंड येथे राहत होते. तर पत्नी पुण्यात नोकरी करून अहमदनगर येथे आई- वडिलांकडे राहात होती.
पुण्यामध्ये एका कंपनीत नोकरी करताना त्यांची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांनी प्रेमविवाह केला होता. कोरोनाची संसर्गाची लाट सुरू झाल्यावर कंपनीने घरातून काम करण्यास परवानगी दिली. पत्नीसह तो झारखंड येथे मूळगावी राहून कंपनीचे काम घरातून करत होता.कोरोनाची लाट ओसरल्यावर कंपनीने पुन्हा कामावर हजर होण्यास सांगितले.तरुणी पुण्यातील कंपनीत हजर झाली तर तरूणास झारखंडमध्ये एका कंपनीत नोकरी मिळाली. दोघांच्या नातेवाईकांनी एकत्र येण्यास आग्रह धरला. तरूणी पुण्यातील कंपनीची नोकरी सोडण्यास तयार नव्हती. तरूण झारखंडमधील नोकरी सोडण्यास तयार नव्हता. त्यामुळे दोघांनी संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
अहमदनगर येथील कौटुंबिक न्यायालय घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. न्यायाधीश संगिता भालेराव यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. ऑनलाईन पद्धतीचा वापर करून दांपत्याचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला आहे. त्यामुळे न्यायालयांच्या खटल्यांचा निपटारा त्वरित होऊन पक्षकारांचा वेळ वाचून त्यांना सुलभ पद्धतीने न्याय मिळाला. झारखंडमधील तरूणाच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ अॅड.भूषण बऱ्हाटे यांनी काम पाहिले.