दुचाकी वाहनांच्या सायलेन्सर मध्ये अनधिकृत बदल करू नयेत
शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांचे आवाहन
नगर : शहरात दुचाकी वाहनांच्या सायलेन्सरमध्ये अनधिकृतपणे बदल करून फटाकड्यांसारखा विचित्र आवाज निर्माण करण्याचे अनुचित प्रकार दिसून येत आहेत. अशाप्रकारे सायलेन्सरमध्ये बेकायदेशीरपणे बदल करून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या व सामाजिक शांतता भंग करणाऱ्या दुचाकी वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तशा सूचना तोफखाना, कोतवाली पोलिस स्टेशन व शहर वाहतूक नियंत्रण शाखेला देण्यात आलेल्या आहेत. कर्कश आवाज निर्माण करून छाप पाडण्यासाठी दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये अनधिकृत फेरबदल करू नयेत व संभाव्य कारवाई टाळण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी केले आहे.