डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सोलापूर हादरले आहे. सोलापूरच्या सांगोलामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे सांगोल्याच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सांगोला पोलिसांनी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. याप्रकरणी पोलिस फरार डॉक्टराचा शोध घेत आहेत.
डॉक्टर पतीच्या शारिरीक आणि मानसिक त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सांगोलामध्ये घडली आहे. या घटनेनंतर तीन दिवसांनी संशयीत आरोपी डॉक्टर सुरज रुपनर यांच्या विरोधात सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हायप्रोफाईल घटनेनंतर सांगोला आणि पंढरपूरच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
संशयीत आरोपी डॉक्टर सुरज रुपनर यांच्यासोबत डॉक्टर ऋचा यांचे २०१२ मध्ये लग्न झाले होते. त्यांना दोन लहान मुलं देखील आहेत. लग्नानंतर डॉक्टर सुरज हा पत्नी ऋचाला वारंवार मानसिक आणि शारिरीक त्रास देवून पैशाची मागणी करत होता. सुरज हा व्यभिचारी वागणूक करीत असताना आढळून आल्याने ऋचा यांनी त्यांना विचारणा केली होती. तर सुरज त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण करून शारीरिक मानसिक त्रास देऊन बघून घेतो असे सातत्याने धमकावत होते.
डॉक्टर ऋचा यांचा विवाह सांगोला येथील प्रसिध्द फॅबटेक उद्योग समुहाचे प्रमुख आणि शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर यांचा मुलगा डॉक्टर सुरज भाऊसाहेब रुपनर यांच्याशी झाला होता. डॉक्टर सुरज आणि ऋचा हे सांगोला येथील फेबटेक इंजिनिअरिंग कॉलेज वसाहतीमध्ये राहत होते. डॉक्टर सुरज आणि डॉक्टर ऋचा दोघेही एमडी रेडिओलॉजिस्ट होते. दोघेही पंढरपूर येथे वैद्यकीय व्यवसाय करीत होते. डॉक्टर ऋचा यांच्या आत्महत्येमुळे सोलापूरमध्ये खळबळ उडाली आहे.