राज्यातील ऊस तोडणी कामगारांचे श्रद्धास्थान लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी परिश्रमपूर्वक जोपासलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा राज्यातील ऊस तोडणी कामगारांच्या भावनेचे प्रतीक आहे. कारखान्यावरील संकट हे सर्वसामान्य मुंडे प्रेमींवर संकट समजून लोकनेते पंकजा मुंडे यांनी आदेश दिल्यास सर्व मुंडे घराण्यांवर प्रेम करणारी कार्यकर्ते ही रक्कम काही तासात उभी करतील. पंकजाताई, तुम्ही मानसिक ताण घेऊ नका, संपूर्ण राज्य तुमच्या पाठीशी आहे, अशा शब्दात भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गर्जे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
गर्जे म्हणाले, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची नोटीस आल्यानंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर मी कारखान्यासाठी बँकेच्या हातापाया जोडत आहे, अशी पोस्ट केली होती. ती सर्वत्र पसरली.
यानंतर मी सोशल मीडियावर पोस्ट टाकली, आपले अस्तित्व असलेले प्रभू वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना अडचणीत आहे. आपल्याला त्यासाठी मदत करायची आहे. तर आपापल्या परीने आपण किती मदत करू शकतो तो आकडा कमेंटमध्ये टाकावा, असे आवाहन केले होते. कोटींच्या माध्यमातून मदत करायची तयारी राज्यभरातील लोकांनी त्या माध्यमातून दर्शवली आहे.
आम्ही फक्त ताई साहेबांच्या आदेशाची वाट पाहत आहोत, आदेश आल्यास येत्या दोन दिवसांत वैद्यनाथ कारखान्यावर जे संकट आले. ते संकट सर्व महाराष्ट्रभरातील कार्यकर्ते मिळून ते दूर करू, असे गर्जे म्हणाले.