उत्साहवर्धकतेने व सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागातून
घरोघरी तिरंगा अभियान यशस्वीरीत्या राबवा – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
अहमदनगर :- केंद्र शासनाने सन 2022 पासून हर घर तिरंगा (घरोघऱी तिरंगा) अभियान सुरु केले असुन यावर्षी या अभियानाचे हे तिसरे वर्ष आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात घरोघरी तिरंगा हे अभियान 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रम राबवुन अत्यंत उत्साहवर्धकतेने व सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागाने यशस्वीरीत्या राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री सालीमठ बोलत होते.
बैठकीस जिल्हा परिषदेच मुख्य कार्यकारी अधिकारी आषिश येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती तर दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व उप विभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार, नगरपालिकांचे सर्व मुख्याधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, जिल्ह्यात घरोघरी तिरंगा अभियान संपूर्ण उत्साहात व्यापक प्रमाणात आपणा सर्वांना साजरे करायचे आहे. सर्व जिल्हा, तालुका आणि गावांमध्ये हे अभियान विविध उपक्रम, नाविन्यपूर्ण संकल्पनासह राबवायचे आहे. त्यासाठी 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध शाळा, महाविद्यालये, विविध सामाजिक संस्था, महिला बचत गट तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून हे अभियान लोकाभिमुख करण्यासाठी यंत्रणांनी विशेष प्रयत्न करावे. या अभियानानिमित्त तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनव्हॉस, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फीज, तिरंगा ट्रब्युट व तिरंगा रॅली अशा विविध उपक्रमांचे आयोजन मोठ्या प्रमाणात गावपातळीपासून ते जिल्हापातळीपर्यंत करावे, जेणेकरून या अभियानात सक्रिय सहभागी होण्याची प्रेरणा नागरिकांना मिळेल.
सर्व संबंधित यंत्रणांनी ध्वजाची मागणी आणि त्याप्रमाणे मुबलक प्रमाणात ध्वजाची उपलब्धता ठेवावी. त्याचसोबत सर्वत्र ध्वजाचा सन्मान ठेवला जाईल, याची खबरदारी सर्वांनी घ्यावी. सर्व नागरिकांना आपल्या घरांवर, शासकीय, निमशासकीय कार्यालये, खासगी आस्थापना, संस्था, संघटना कार्यालय या सर्वांना या अभियानात सक्रिय सहभागी होत दि.१३ ते १५ या कालावधीत तिरंगा लावण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. नागरिकांनी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वजासोबतची सेल्फी घेऊन harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी यावेळी केले.