उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीसंदर्भात मोठं निधान केलं. “मी ७ ते ८ वेळा निवडणूक लढलो, आता मला रस राहिला नाही”, असं अजित पवार यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आलं. यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवर नाव न घेता खोचक टीका केली आहे. “सेनापतीच गळपटला असेल सैन्यांनी लढायचं कसं? हा त्यांच्यामधील नेत्यांना प्रश्न पडला असेल”, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
“चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे, असं म्हणतात. मात्र, इथे अजित पवार हे जवळपास २२ वर्ष सत्तेत होते. त्यामुळे ते ६६ टक्के सत्तेत आणि ३३ टक्के विरोधात अशी अजित पवार यांची कारकीर्द राहिलेली आहे. मात्र, आता आता पराभव समोर दिसत असल्यामुळे की महायुतीत त्यांची घुसमट होत आहे? अजित पवारांबरोबर जाण्यासाठी ज्या-ज्या लोकांनी शरद पवारांचं बोट सोडलं. त्या प्रत्येकाची मला चिंता वाटते. कारण सेनापतीच गळपटला तर सैन्यांनी लढायचं कसं? हा प्रश्न आता त्यांना नक्कीच पडला असेल”, अशी खोचक टीका अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांवर केली.