अहमदनगर -बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर सर्वच शाळांतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने प्रत्येक जिल्ह्यातील शाळांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे आदेश सर्व शिक्षणाधिकार्यांना दिले आहेत. त्यादृष्टीने सर्व शाळांत सीसीटीव्ही, तक्रारपेटी, सखी सावित्री समिती स्थापन करून तातडीने अहवाल पाठवण्याच्या सूचना शिक्षणाधिकार्यांनी प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.
बदलापूर येथे दोन चिमुकल्यांवर अत्याचाराच्या घटनेनंतर सर्व स्तरांतून या घटनेचा निषेध नोंदविण्यात येत आहे. दुसरीकडे इतर शाळांतही मुले सुरक्षित आहेत का? याचा आढावा तातडीने शासनाकडून घेण्यात येत आहे. शालेय शिक्षण विभागाने, संचालकांना व तेथून प्रत्येक शिक्षणाधिकार्यांकडून हा अहवाल तातडीने मागवला आहे. त्या अनुषंगाने माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी 20 ऑगस्ट रोजी सर्व व्यवस्थापन शाळांच्या प्राचार्य, मुख्याध्यापकांना पत्र देत प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही, तक्रार पेटी व सखी सावित्री समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या तीन बाबी शाळेत कार्यान्वित करून पूर्तता अहवाल गटशिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकारी यांना तत्काळ सादर करावा. त्याची एक प्रत या कार्यालयाला सादर करावी. आठ दिवसांत या तिन्ही गोष्टींची पूर्तता केली नाही तर कडक कारवाईच्या सूचना शासनाने दिलेल्या असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
प्रत्येक वर्गखोली व शाळेचा परिसर यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असावा. त्याचे नियंत्रण मुख्याध्यापक कार्यालयातून असावे. स्क्रीन योग्य असावा. कोणत्याही तांत्रिक कारणास्तव सीसीटीव्ही यंत्रणा नादुरुस्त ठेवू नये. 24 तास कार्यान्वित ठेवावी. प्रत्येक शाळेत मुख्याध्यापक खोलीबाहेर तक्रार पेटी असावी. ती आठवड्यातून विशिष्ट वार निश्चित करून खोलावी. तक्रार निवारण समिती, सखी सावित्री समिती यांनी तक्रारींची दखल घेऊन त्वरित आवश्यक उपाययोजना कराव्यात. तक्रार पेटी उघडते वेळी महिला सदस्य असणे आवश्यक राहील. शासन निर्णयानुसार प्रत्येक शाळेत सखी-सावित्री समिती स्थापन करावी. शासन निर्णयात अंतर्भूत तरतुदी समितीच्या, पालकांच्या निदर्शनास आणून द्याव्यात. शासन निर्णयाचे पालक, शिक्षक बैठकीत प्रकट वाचन करावे. विहित मुदतीत बैठका घ्याव्यात. कोणत्याही कारणास्तव बैठकांमध्ये जास्त खंड पडू देऊ नये.
शाळा स्तरावर उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. पालकांनी विद्यार्थ्यांशी सातत्याने संवाद ठेवला पाहिजे. विविध समितीतील समाविष्ट सर्व घटकांनी यामध्ये वेळ देऊन गांभीर्याने चर्चेत सहभागी झाले पाहिजे. शाळेच्या वर्ग परिसरात अनावश्यक लोकांना विनाकारण प्रवेश देऊ नये. जेव्हा बाह्य लोकांना प्रवेश दिला जातो त्यावेळी त्यांच्यासोबत जबाबदार व्यक्ती ठेवावी. मुलांच्या सुरक्षेत तडजोड केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल.
– अशोक कडूस, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग