Thursday, September 19, 2024

शासनाच्या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा -विभागीय आयुक्त डॉ.प्रविण गेडाम

राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची गतिमानतेने व

प्रभावीपणे अंमलबजावणी करा

-विभागीय आयुक्त डॉ.प्रविण गेडाम

अहमदनगर – राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांचा लाभ सर्वसामान्यांना सुलभतेने घेता यावा यादृष्टीने नियोजन करत या महत्वाकांक्षी योजना जिल्ह्यात प्रभावीपणे व गतिमानतेने राबविण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजनांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी विभागीय आयुक्त श्री गेडाम बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांच्यासह योजनांचे समन्वय अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम म्हणाले की, राज्य शासनाच्या फ्लॅगशिप योजनांपैकी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजना असुन या योजनेंतर्गत जिल्ह्यात ७ लाखापेक्षा अधिक लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. या योजनांचा लाभ महिला लाभार्थ्यांना सुलभतेने घेता यावा यादृष्टीने योजना राबवावी. योजना राबविण्यात काही तांत्रिक अडचणी येत असतील तर त्यांची प्राधान्याने सोडवणूक करावी. ज्या महिला लाभार्त्यांचे बँक खाते आधार क्रमांकसोबत अद्यापही जोडण्यात आलेले नाहीत ते तातडीने लिंक करून घेण्यात घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

मुख्यमंत्री-युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे युवकांना खासगी तसेच शासकीय, निमशासकीय आस्थापनेवर प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. जिल्ह्यातील अधिक पदे असलेल्या पोलीस, आरोग्य, महानगरपालिका, विद्युत विभाग यासारख्या आस्थापणा बरोबरच सर्व ग्रामपंचायती, जिल्ह्यातील मोठ्या शाळांमधून या युवकांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी. जिल्ह्यातील सहकार, सेवाक्षेत्रातूनही या युवकांना प्रशिक्षणाची संधी देण्याचे निर्देश श्री गेडाम यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत लाभार्थ्यांना देशातील व राज्यातील ज्या तीर्थक्षेत्राला भेट द्यावयाची इच्छा असेल त्यादृष्टीने या तीर्थदर्शनचे सुयोग्य नियोजन करण्यात यावे. तसेच जिल्ह्यात मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत ३ हजार १८७ लाभार्थी पात्र ठरले आहेत. जिल्ह्यातील अधिकाधिक लाभार्थ्यांना या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ देण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त श्री गेडाम यांनी यावेळी दिल्या.

यावेळी श्री गेडाम यांनी अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना या योजनांचाही विस्तृतपणे आढावा घेतला. तसेच महसुल विभागामार्फत देण्यात येणा-या महसुली सेवांचा आढावा ही विभागीय आयुक्तांनी यावेळी घेतला.या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी सादरीकरण केले. या बैठकीस सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles