ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दावा केला आहे की महाराष्ट्र भाजपातील वरिष्ठ नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना राज्यपालपद देण्याचं आश्वासन दिलं होतं.
एकनाथ खडसे एबीपी माझा वृत्त वाहिनीच्या माझा कट्ट्यावर बोलत होते.
एकनाथ खडसे म्हणाले, “एके दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी मला बोलावलं, मी त्यांच्याकडे गेलो. तुम्ही प्रसारमाध्यमं म्हणत आहात ज्याप्रमाणे पंकजा मुंडेंना त्यांनी न्याय दिला, त्याप्रमाणे मला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, असं ते मला म्हणाले. फडणवीस मला म्हणाले, मी आता तुम्हाला राज्यपाल करणार आहे. तशी मी वरिष्ठांकडे शिफारस करणार आहे. त्यावर मी त्यांना स्पष्ट म्हणालो, देवेंद्रजी तुम्ही बऱ्याचदा अशी आश्वासनं देता, हे करेन, ते करेन, परंतु तुम्ही ती आश्वासनं पूर्ण करत नाही. त्यामुळे मला खरं सांगा, कारण माझा विश्वास बसत नाही. त्यावर ते मला म्हणाले, आम्ही तुम्हाला राज्यपाल करणार आहोत. मी त्यांना म्हटलं, आनंदाची गोष्ट आहे, मला राज्यपाल केलं तर चांगलंच आहे. परंतु माझा या आश्वासनांवर विश्वास नाही. त्यावर देवेंद्र फडणवीस मला म्हणाले मी माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो आम्ही तुम्हाला राज्यपाल करणार आहोत. हे देवेंद्र फडणवीस यांचे शब्द जसेच्या तसे मी तुम्हाला जाहीरपणे सांगत आहे”.