महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे आता भाजपात जाणार आहेत. महिन्याभरापूर्वीच त्यांनी याबाबत माहिती दिली होती. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमामुळे त्यांचा भाजपा प्रवेश रखडला आहे. तसंच, ते यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचंही त्यांनी आज स्पष्ट केलं. ते एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
महाराष्ट्रातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून २०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक हरलेल्या रोहिणी खडसे २०२० मध्ये एकनाथ खडसे यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्या. एकनाथ खडसे यांनी ४० वर्षांचे भाजपाबरोबरचे ऋणानुबंध तोडून शरद पवारांना साथ दिली. शरद पवारांच्या साथीने एकनाथ खडसे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झाले होते. परंतु, राष्ट्रवादीत भवितव्य दिसत नसल्याचं कारण दे त्यांनी पुन्हा भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही काळात त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश होईल. परंतु, त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीत गेलेल्या त्यांच्या कन्या रोहिणी खडसे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आहेत.
“मी राजकारणातून निवृत्ती घेतलेली नाही. मी राजकीय माणूस आहे. पण आता निवडणूक लढवण्याकडे माझा कल नाही”, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.