राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरले जात आहेत. दोन कोटीहून अधिक महिलांना या योजनेसाठी पात्र ठरवण्यात आलं आहे. मात्र, या योजनेच्या अर्जप्रक्रियेदरम्यान गैरप्रकार झाल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. साताऱ्यात एका व्यक्तीने ३० जणांच्या आधार कार्डचा गैरवापर करून तब्बल ३० अर्ज भरले आहेत. तर पनवेलमध्ये व्यक्तीने एका महिलेचा वेगवेगळ्या पोशाखात फोटो वापरून अर्ज भरला आहे. दरम्यान, या घटनानंतर आता गैरप्रकार करणाऱ्यांना थेट मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांना या घटनांबाबत विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, लाडकी बहीण योजना गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील महिलांसाठी असून यात गैरप्रकार करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.“या योजनेत कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील महिलांसाठी आहे. यात कोणीही भ्रष्टाचार केला, तर तो खपवून घेतला जाणार नाही. आरोपींना थेट तुरुंगात टाकलं जाईल”, असा इशारा त्यांनी दिली.