राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने पक्षचिन्ह आणि पक्षनावावर दावा सांगितला आहे. हे प्रकरण सध्या निवडणूक आयोगाकडे गेलं आहे. राष्ट्रवादी पक्ष कुणाचा? यावर ९ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीत अजित पवार गटाकडून बनावट प्रतिज्ञापत्रे सादर केल्याचा युक्तिवाद शरद पवार गटाच्या वकिलांकडून करण्यात आला.
निवडणूक आयोगासमोरील सुनावणी पार पडल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘एक्स’वर लिहिलेल्या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणाले, “निवडणूक आयोगासमोर चिन्ह आणि पक्ष याबाबतच्या वादासंबंधी सुनावणी होती. फुटीर गटातर्फे जे अॅफिडेव्हीट देण्यात आलं होतं. त्या अॅफिडेव्हीटमध्ये जी काही प्रतिज्ञापत्र जोडली होती, त्याची चिरफाड अभिषेक मनुसंघवी या ज्येष्ठ वकिलांनी केली. त्यांनी त्या अॅफिडेव्हिटचे २४ भाग बनवले आणि त्याच्यामध्ये दाखवून दिलं की, अल्पवयीन मुलांची प्रतिज्ञापत्र जोडली होती, वृद्धांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सदस्य दाखवले होते. मृत व्यक्तींच्या नावाने प्रतिज्ञापत्र होती. एका प्रतिज्ञापत्रावर तर ‘हाऊस वाईफ’ असं नाव लिहिण्यात आलं होतं. काही ठिकाणी एकाचेच नाव तीन वेळा टाकण्यात आलं होतं. एकाच पत्त्यावर अनेक प्रतिज्ञापत्र तयार करण्यात आली होती. व्हेरिफिकेशन लातूरचं आणि प्रतिज्ञापत्र मुंबईचं, अशा प्रकरणात जवळ-जवळ २० हजार प्रतिज्ञापत्र ही खोटी सादर करण्यात आली आहेत, असं ज्येष्ठ वकील अभिषेक मनुसंघवी यांनी निवडणूक आयोगाला पुराव्यासहीत दाखवून दिलं.”