केंद्रीय निवडणूक आयोगाकडील प्राप्त निर्देशानुसार आगामी लोकसभा निवडणूकीच्या पूर्व तयारीचे कामकाज हे विहित कालावधीत पूर्ण करण्याबाबतची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक २०२४ या करिता निवडणूक आयोगाने राष्ट्रीयकृत बँका, को-ऑपरेटिव्ह बँका आणि खाजगी बँकांकडून रोख रक्कम रेमिटन्सद्वारे आणावयाची असेल किंवा पाठवायची असेल तसेच रोखीचे मोठे व्यवहार होत असतील तर त्याकरिता संबंधित बँकेच्या प्रत्येक शाखेच्या शाखा प्रबंधकाना एक क्यूआर कोड देण्यात येणार आहे. त्याकरिता प्रत्येक बँकेने त्यांच्या मुख्य शाखेतून एक नोडल ऑफिसरची नेमणूक करणे आवश्यक आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, मुख्य बँकेतील नोडल ऑफिसरचे युजर आयडी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तयार करून दिले जाईल आणि त्या नोडल ऑफिसरने त्यांच्या बँकेच्या सर्व शाखा प्रबंधकाचे यूजर आयडी तयार करणे आवश्यक आहे. कारण प्रत्येक शाखेची कॅश मुव्हमेंट होत असताना त्या शाखेकडून क्यू आर कोड जनरेट होणे अत्यावश्यक आहे. क्यू आर कोड नसताना जर कॅश रेमिटन्स केली आणि ती कॅश निवडणूक अधिकाऱ्याकडून पकडण्यात आली, तर त्याच्यावर आयोगाकडील मार्गदर्शक सूचनांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घेण्याविषयी आवाहन करण्यात आले आहे.