अहमदनगर -जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 84 ग्रामपंचायतीच्या सदस्य मंडळ आणि वेगवेगळ्या कारणामुळे रिक्त असणार्या 155 सदस्यांच्या जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार जिल्हा निवडणूक विभागाने 19 जुलैला तालुकानिहाय प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिध्द केली होती. मात्र, या ग्रामपंचायतीसह रिक्त असणार्या सदस्या पदाच्या जागांच्या निवडणूका लांबवणीवर पडणार आहेत. निवडणूक आयोगाने याबाबत जिल्हा प्रशासनास तोंडी सुचना देत आता विधानसभा निवडणुकीनंतर या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
जानेवारी ते डिसेंबर 2024 या कालावधीत मुदत संपणार्या, नवनिर्मित, मागील निवडणुकीत चुकीची प्रभाग रचना झालेल्या, तसेच बहिष्कार व अन्य कारणामुळे निवडणूका न होऊ शकलेल्या राज्यातील सुमारे 1 हजार 588 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी, तसेच सदस्य अथवा थेट सरपंच यांच्या रिक्त असणार्या जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यासाठी मे महिन्यांत झालेल्या लोकसभा निवडणुकीत वापरलेली विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार यादी वापरून मुदत संपणार्या ग्रामपंचायतीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्याच्या आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानूसार मागील महिन्यांत जिल्ह्यात मुदत संपणार्या ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली.
जिल्ह्यात 84 ग्रामपंचायत आणि 155 ग्रामपंचायत सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. यामध्ये काही ठिकाणी निधन तर काही राजीनामा दिलेल्या सदस्यांचा समावेश आहे. अकोले तालुक्यात सर्वाधिक 69 सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यानंतर शेवगाव 19, संगमनेर 14 आणि नेवासा तालुक्यातील 10 सदस्यांचा समावेश आहे. 16 मार्च ते 6 जूनपर्यंत लोकसभा निवडणुकीसाठी आणि त्यानंतर शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी 6 जुलैपर्यंत आचारसंहिता लागू होती. दरम्यान, ही आचारसंहिता सुरू असतानाच निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुका झाल्यानंतरच ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असल्याचा अंदाज होता.
मात्र, अचानक राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील मुदत संपणार्या ग्रामपंचायती आणि रिक्त सदस्यांच्या जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पूर्व तयारी सुरू केली. त्यामुळे जिल्ह्यात 84 ग्रामपंचायतमध्ये विधानसभा निवडणूकांआधी ग्रामपंचायत निवडणूका होण्याची शक्यता होती. यासाठी जिल्हा प्रशासनाने 9 जुलैला प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करत 19 जुलैला तालुकानिहाय प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली. त्यानंतर याठिकाणी निवडणूक कार्यक्रमाची वाट पाहता असतांना मागील आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाने आता या निवडणूका विधानसभेनंतर म्हणजेच डिसेंबरमध्ये घेण्यात येणार असल्याचे तोंडी सांगितले आहे.
मुदत संपलेल्या ग्रामपंचायत आणि कंसात सदस्य पद
अकोले 8 (69 सदस्य), संगमनेर 2 (14 सदस्य), कोपरगाव 3 (7 सदस्य), राहाता 1 (3 सदस्य), श्रीरामपूर 2 (7 सदस्य), राहुरी 3 (6 सदस्य), नेवासा 26 (10 सदस्य), शेवगाव 6 (19 सदस्य), पाथर्डी 4 (6 सदस्य), जामखेड 3 (सदस्य 5) श्रीगोंदा 1 (4 सदस्य), कर्जत 8 (3 सदस्य), पारनेर 1 (6 सदस्य) आणि नगर 7 (6 सदस्य) एकूण 84 ग्रामपंचायत आणि 155 सदस्य यांचा समावेश आहे.
लांबलेल्या 84 ग्रामपंचायत आणि 155 सदस्यांच्या जागांसाठी विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिध्द करावी लागणार आहे. जुलै महिन्यांत प्रसिध्द करण्यात आलेली मतदार यादी ही लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीवर आधारीत होती. आता विधानसभा निवडणुकीनंतर होणार्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नव्याने विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीनूसार नव्याने प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. यात वेळ आणि पैसा दोनही वाया जाणार आहे.