नगर : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे माजी राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकण्ो यांची वंजारी समाज राष्ट्रीय जयंती उत्सव समितीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत घुगे, राष्ट्रीय सचिव तुकाराम सांगळे यांनी या निवडीचे पत्र नुकतेच ढाकणे यांना दिले. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष नामदेव सानप, राष्ट्रीय उपाध्यक्षा मायाताई बुरकुल, राष्ट्रीय युवा आघाडीचे अध्यक्ष विक्रम नागरे आदी उपस्थित होते. ढाकणे यांनी शासकीय सेवेसह सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांच्यावर समाजाच्या संघटनेची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या निवडीबद्दल बोलताना एकनाथ ढाकणे म्हणाले, शासकीय सेवेतून निवृत्त होतानाच समाजासाठी भरीव कार्य चालूच ठेवण्याचा निश्चय केला होता. समाजाने आता राष्ट्रीय जयंती उत्सव समितीच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा मोठ्या विश्वासाने माझ्यावर सोपवली आहे. या माध्यमातून राज्यभर दौरे करून समाजाला संघटीत केले जाईल. समाजाच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवण्यात येईल. राष्ट्रीय उत्सव समिती अंतर्गत वंजारी समाजाचे आराध्य राष्ट्रसंत भगवान बाबा,संत वामनभाऊ, अवजिनाथ बाबा,स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती, पुण्यतिथी उत्सव संपूर्ण देशभर आणि महाराष्ट्रामध्ये सर्व समाजामध्ये साजऱ्या व्हाव्यात. समाजामधील अंधश्रद्धा रुढी परंपरा नष्ट होऊन समाज मुख्य प्रवाह बरोबर शिक्षणाबरोबर स्वयंरोजगारांमध्ये स्वावलंबी व्हावा या उद्देशाने संपूर्ण देशभर आणि महाराष्ट्रामध्ये उत्सव समितीचे कार्य चालू आहे. या कमिटीचा विस्तार आणि भविष्यकालीन वंजारी समाजाचे ध्येयधोरण, जडणघडण, भगवानबाबा, वामनभाऊंचे कार्य त्यांचे विचार सर्व घटकापर्यंत पोहोच करण्याच्या हेतूने समिती कार्यरत आहे. संत भगवान बाबा, संत वामनभाऊ जयंती पुण्यतिथी उत्सव शासनामार्फत अधिकृत घोषित व्हावेत, अशी आग्रही मागणी ढाकणे यांनी केली आहे. लवकरच पुणे येथे समाजाचा मेळावा घेऊन पुढील रणनीती धोरण ठरवण्यात येईल.