नगर तालुक्यात राजकियदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणा-या नगर तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाची निवडणुक जाहीर झाली आहे. या साठी १८ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर उमेदवारी अर्ज विक्री व स्विकारण्याची प्रक्रिया शुक्रवार (दि.१२) पासूनच सुरु झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा भाजपा विरुद्ध महाआघाडी असा सामना रंगणार आहे.
संचालकांच्या एकूण १७ जागा आहेत, त्यासाठी शुक्रवार (दि.१२) पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुकांना १२ ते १८ जानेवारी दरम्यान आपले अर्ज तालुका उपनिबंधक कार्यालय, महात्मा फुले चौक, नगर येथे दाखल करता येतील. प्राप्त अर्जाची १९ जानेवारी रोजी छानणी होवून २२ जानेवारी रोजी वैध अर्जांची यादी प्रसिद्ध होईल, तद्नंतर २२ जानेवारी ते ५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल, ६ फेब्रवारीला चिन्हवाटप होवून १८ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी मतदानानंतर मतमोजणी होईल.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नगर तालुका सहाय्यक उपनिबंधक शुभांगी गौड या काम पाहणार असून, त्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय बनसोडे व संघाचे व्यवस्थापक एम. बी. पळसकर हे मदत करतील.