राष्ट्रवादीला सरकारमध्ये घेताना विश्वासात घेतलं नाही. सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत आल्याने शिंदे गटातील आमदारांची अडचण झाली आहे, अतिरेकानंतर स्फोट होईल, अशी खदखद माजी मंत्री बच्चू कडू यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत घेताना त्यांचं मंथन आणि चिंतन व्हायला पाहिजे होतं. आम्हाला विचारात आणि विश्वासात न घेता राष्ट्रवादीला सोबत घेतलं आहे, असा दावा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारमध्ये सोबत घेतल्याने आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या सर्व आमदारांची अडचण झाली आहे. कारण मविआ सरकारमध्ये राष्ट्रवादीचा त्रास होता, काम होत नव्हते. शिवसेनेचे मतदार संघ फोडून त्यांच्या मतदारसंघाची बांधणी होत होती, असा आरोप होता. मात्र त्या आरोपाला आता छेद लावण्याचा प्रयत्न आहे. तर ज्यांनी हा उठाव केला त्यांनीच आपल्या डोक्यावर ही कुऱ्हाड मारून घेऊ नये. त्यांचं आयुष्य पणाला लावता कामा नये. सत्तेसाठी काही पण असं होऊ नये, याची आम्हाला अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.