काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष मिठूभाई शेख यांच्या छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह शनिवारी(6 डिसेंबर) सकाळी शेवगाव रोडलगत असलेल्या खेर्डा फाटा येथील शेतात आढळून आला. गेल्या काही दिवसांपासून ते बेपत्ता होते. शेख हे तीस वर्ष तालुक्याच्या राजकारणात सक्रिय होते. त्यांच्या राजकारणाची सुरवात माजी केंद्रीयमंत्री स्व.बबनराव ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली झाली. स्व. राजीव राजळे यांनी स्व.राजीव गांधी यांचे छायाचित्र असलेले कॅलेंडर प्रकाशित केल्यानंतर शेख यांनी दिल्ली गाठत त्या कॅलेंडरचे प्रकाशन सोनिया गांधी यांच्या हस्ते केले होते. अजमेर येथील शरीफ दर्ग्यावर त्यांची मोठी श्रद्धा होती. अजमेरला जाताना ते आपल्या समवेत अनेक तरुणांना घेऊन जायचे.
पाथर्डी ग्रामपंचायतीचे सदस्य, सरपंच पदही त्यांनी भूषवले होते तर पाथर्डी पालिकेच्या पहिल्या निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 25 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांच्या नातेवाईकांनी ते बेपत्ता झाल्याची खबर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. शनिवारी त्यांचा मृतदेह खर्डा फाटा येथे आढळून आल्याचे समजताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल अभयसिंग लबडे, पोलीस कॉन्स्टेबल राम सोनवणे, इजाज सय्यद, संजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत शेख यांच्या कुटुंबियांना बोलावून त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवली.
पोलिसांनी शेवगाव रोडच्या काही दुकानातील सीसीटिव्ही फुटेज तपासले असता त्याच्या अंगावर असलेल्या कपड्यांवरून व पायातील चपलांवरून मृतदेह शेख यांचाच असल्याची खात्री पटली. शनिवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले तर त्यांचे काही अवशेष डीएनए तपासणीसाठी नाशिकला पाठवले असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर यांनी दिली.