महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून दुधाचे दर दूध संघाने पाडले आहेत. गाईच्या दुधाला किमान ३४ रुपये लिटर दर दिला पाहिजे हा सरकारचा अध्यादेश सर्व दूध संघांनी धुडकावून लावला आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात दूध आणि ऊस दरावरुन ठिकठिकाणी आंदोलने पाहायला मिळत आहेत. आज शेतकर्यांनी नेवासा – श्रीरामपूर महामार्ग अडवत आंदोलन केले.
अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी दूध दराच्या वाढीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी दुध दरात घट झाल्याच्या निषेधार्थ आंदोलने सुरू आहेत. दूध दरामध्ये तब्बल १० रुपयांची घट झाली आहे. म्हशीच्या दुधाचा दर ५६ रुपयांवरून ४६ रुपये तर गाईच्या दुधाचा भाव ३८ वरून २८ रुपये झाला आहे.
सध्या दुष्काळ असल्याने दुधाचे उत्पादन घटले असल्याने मागणी पुरवठ्याचे गणित पाहता दूध दर वाढायला पाहिजे होते. याऊलट दूध दरात कमी झाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे शेतकऱ्यांनी ऊसदर वाढ तसेच दूध दरवाढीसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले.ऊसाला 3500 रूपये दर जाहीर करावा तर दुधाला किमान 40 रूपये दर द्यावा अशी मागणी करत आंदोलकांनी हरेगावफाटा येथे नेवासा श्रीरामपूर महामार्ग अडवत रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती