अहमदनगर-पाथर्डी:(प्रतिनिधी) तालुक्यातील हत्राळ येथे कौटुंबीक वादातून माणिक सुखदेव केदार यांच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्याची घटना बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.यामध्ये बंदुकीची गोळी लागून केदार हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.
दरम्यान,गावातील नागरिकांनी संशयित आरोपी सुभाष विष्णू बडे,रा.येळी,ता.पाथर्डी याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील येळी येथील सुभाष विष्णू बडे याचे लग्न झाले होते.आठ वर्षानंतर पती-पत्नीमध्ये घटस्फोट झाला होता.त्यानंतर घटस्फोटीत महिलेने हत्राळ येथील युवकाशी विवाह केला होता.त्याच रागातून सुभाष बडे याने बुधवारी सायंकाळी हत्राळ येथील केदार वस्तीवर जाऊन कुटुंबावर सशस्त्र हल्ला केला असल्याचे समजते.याबाबत पाथर्डी पोलीस पुढील तपास करत आहेत.