राष्ट्रपती भवनात भारत कला महोत्सवात डॉ.अमोल बागुल यांचे बासरीवादन
राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांनी केले उद्घाटन
अहिल्यानगर
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय व ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती निलयम भवन येथे आयोजित भारतीय कला महोत्सवामध्ये येथील दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार-बासरीवादक डॉ.अमोल बागुल यांचे बासरी वादन संपन्न झाले.भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या महोत्सवाच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन संपन्न झाले.
या महोत्सवाचे विशेष निमंत्रण डॉ.बागूल यांना प्राप्त झाले होते.सुमारे दहा मिनिटांच्या सादरीकरणात बासरीवादनातून विविध रागदारी प्रस्तुत केल्यामुळे आयोजन समितीच्या वतीने सहभागींचा सत्कार करण्यात आला.या महोत्सवातून अरुणाचल प्रदेश,आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा या ईशान्येकडील राज्यांचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा पर्यटकांसमोर सादर करण्यात आला.यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाले की, “आपल्या देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.या महोत्सवातून सांस्कृतिक विविधता, त्यांचे लोकनृत्य, संगीत, कला आणि पारंपरिक पोशाख हा आपल्या देशाचा वारसा जपताना नागरिकांना प्रदेशातील परंपरा आणि समुदायांची अधिक ओळख करून देण्याचा प्रयत्न आहे.” तेलंगणाचे राज्यपाल,केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन मंत्र्यांसह सर्व आठ ईशान्येकडील राज्यांचे राज्यपाल तसेच डोनर राज्यमंत्री उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते.
डॉ.बागूल हे सुमारे 23 वर्षांपासून बासरीवादन करीत असून आजपावेतो हजारो संगीतप्रेमींना त्यांनी बासरीवर राष्ट्रगीत व संगीतातील सरगम शिकवली आहे.यापूर्वी भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालय व रशियाच्या भारतातील दूतावासाच्या वतीने आयोजित भारत-रशिया संयुक्त मैत्री महोत्सवात बासरीवादन कला प्रचार व प्रसारासाठी राष्ट्रीय संस्कृती पुरस्कार प्राप्त झाला होता.नवी दिल्ली येथे महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने संपन्न झालेल्या भारत बाल मेळाव्यात देशातील 1000 आदिवासी मुलांना बासरीवर शिकवलेले राष्ट्रगीत, राजघाटावरील महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळावर जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमात बासरीवादनातून श्रद्धांजली,योगगुरू रामदेव बाबांच्या योग प्रात्यक्षिक सोहळ्यातील बासरीवादन ,आर्ट ऑफ लिव्हींगच्या श्री श्री रविशंकर यांच्या माध्यमातून नाशिक येथे संपन्न झालेल्या “वेणूनाद” या सुमारे 8000 बासरीवादकांच्या गिनीजच्या जागतिक विश्वविक्रमात सहभाग ,विविध उन्हाळी,दिवाळी व नाताळ सुट्ट्यांमध्ये हजारो बालसंस्कार शिबिरांमधील बालकलाकारांसाठी बासरी वर्ग,विविध सोहळ्यांतील सूत्रसंचालनाप्रसंगी श्रद्धांजली,दीप प्रज्वलन,सत्कार याप्रसंगीचे बासरीवादन ,विविध नाटके, लघुपट, माहितीपट,एकांकिका आदी सादरीकरणातील पार्श्वसंगीत, फलकलेखन व रांगोळी रेखाटनामध्ये सजावटीसाठी बासऱ्यांचा वापर,भजन,कीर्तन, प्रवचनामध्ये बासरीवादन,शाळेतील अध्यापनात बासरीवर चाल लावून पाठ्यपुस्तकातील कविता-गाणी सादरीकरण,विविध कृषी विद्यापीठांच्या “झाडे व पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त संगीत-चिकित्सा” संकल्पनेत सहभाग आदी उपक्रमांची दखल राष्ट्रपती भवनाने घेतली.
नगरमधील स्व.शाहीर रंगनाथ कनगरे, मधुकर ओक, कशाळकर गुरुजी, पुणे यांच्या मार्गदर्शनातून बागुल यांनी बासरीवादनाचे धडे घेतले आहेत. डॉ बागुल यांच्या संग्रही आज पावेतो सहा हजारांपेक्षा अधिक विविधांगी बासऱ्यांचा संग्रह आहे.बासरीवादनाव्यतिरिक्त तबला,हार्मोनियम, सुंदरी,व्हायोलिन आदी विविध वाद्यांचे प्रशिक्षण बागुल यांनी घेतले आहे.